जालना : मराठा समाजाला जाणूनबुजून त्रास देण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून षड्यंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी जालन्यात पत्रकार परिषदेत केला. निवडणुकीच्या काळात, उपोषणादरम्यान आणि आंदोलनाच्या वेळीही आपल्याविरोधात षड्यंत्र रचण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. एका कथित ऑडिओ क्लिपचा संदर्भ देत त्यांनी राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी
माझ्याविरोधात एवढ्या भयंकर स्वरूपाचे षड्यंत्र का रचले जात आहे, याचा शोध पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अशी मागणी जरांगे यांनी केली. राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मराठा समाजाने या घडामोडी गांभीर्याने लक्षात घ्याव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
पत्रकार परिषदेत दाखवण्यात आलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, सुषमा अंधारे, शरद पवार आणि श्रीकांत शिंदे यांच्यासह विविध राजकीय व्यक्तींच्या संदर्भांचा उल्लेख असल्याचे जरांगे यांनी सांगितले. जरांगे यांच्याविरोधात बोलण्यासाठी काही नेत्यांचा वापर करण्याबाबत, भाजपमधून कोणी बोलण्यास तयार नसल्याबाबत तसेच त्यांना बदनाम करण्याच्या कथित प्रयत्नांबाबत या क्लिपमध्ये उल्लेख असल्याचा त्यांचा दावा आहे.
या कथित ऑडिओ क्लिपमध्ये ५०० कोटी रुपयांचाही उल्लेख असल्याचे सांगत जरांगे यांनी हे पैसे कोणी दिले, याचा शोध घेण्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
‘५०० कोटी रुपये कोणी दिले, याचा शोध घ्या’
“आम्ही सत्य जनतेसमोर ठेवले आहे. आता ५०० कोटी रुपये कोणी दिले, याचा शोध घेतला पाहिजे. फडणवीस साहेब, तुम्ही याचा शोध घ्या. शोध घेतला नाही, तर तुम्हीही यात सहभागी आहात, असा माझा समज होईल,” असा इशारा जरांगे यांनी दिला. २०२९ च्या निवडणुकीत भाजपचा एकही उमेदवार निवडून येऊ देणार नाही, असे आव्हानही त्यांनी दिले.
आपण गरीबांसाठी आंदोलन करत असल्यामुळे आपल्याविरोधात राजकीय डावपेच आखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्याविरोधात बोलणाऱ्यांना राजकीय पाठबळ दिले जात असल्याचा दावा करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दलही नाराजी व्यक्त केली.
“शिंदे साहेब, आम्हाला तुमचा अभिमान होता; मात्र तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती,” असे ते म्हणाले. आपल्याविरोधात बोलणाऱ्यांमध्ये शिंदे यांच्या गटातील अनेकांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप
आपल्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. बीडमधील प्रकरणांचा संदर्भ देत त्यांनी या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. तसेच, आपल्याविरोधात बातम्या करण्यासाठी पत्रकारांवर दबाव आणला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. उपोषणादरम्यान आपण भाकरी खात असल्याचे आरोपही जाणीवपूर्वक पसरवले जात असल्याचे ते म्हणाले.
कथित ऑडिओ क्लिपमध्ये ‘व्होट जिहाद’, मराठा समाजाचे ओबीसीकरण आणि संभाजीनगरमधील कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणासह विविध मुद्द्यांवर प्रचार करण्याबाबत उल्लेख असल्याचा दावाही जरांगे यांनी केला.
