मुंबई, ता, 24 : राज्यातील पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत त्यांना जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मजबूत कायदा-सुव्यवस्था हीच राज्याच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली असल्याचेही त्यांनी ठामपणे अधोरेखित केले.

३६ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ च्या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी हा स्पष्ट संदेश दिला. सशस्त्र पोलीस मुख्यालय, कलीना (सांताक्रूझ पूर्व) येथे पार पडलेल्या या भव्य कार्यक्रमात मंत्री मंगल प्रभात लोढा, गृहराज्यमंत्री योगेश कदम, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कालीना येथील सुसज्ज मैदान, पोलीस कॉलनी आणि उत्कृष्ट सुविधा यांचे कौतुक करत त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले. तसेच पोलीस केवळ कर्तव्यदक्ष अधिकारी नसून क्रीडा, पोलीस बँड, संगीत, लेखन आणि कला क्षेत्रातही पुढे असल्याचे सांगत त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला.

शेवटी, पोलिसांच्या त्याग आणि सेवाभावाचे स्मरण करून त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले, “खाकी म्हणजे सेवा, त्याग आणि देशभक्तीचे प्रतीक आहे.” सर्व खेळाडूंना नव्या विक्रमांसाठी शुभेच्छा देत त्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने ‘महाराष्ट्र पोलीस महा ऑलिम्पिक’चे स्वरूप प्राप्त झाल्याचे नमूद केले.
या स्पर्धेमुळे राज्यभरातील पोलीस अधिकारी व कर्मचारी एकत्र येत क्रीडांगणावर आपली क्षमता सिद्ध करत असून, “पोलिसांच्या पाठीशी खंबीर सरकार आणि जागतिक पातळीवर झेप घेणारे महाराष्ट्र पोलीस” असा स्पष्ट संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.