खेड : मतदारसंघाचा विकास करताना केवळ रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधाच नव्हे, तर आपल्या माणसांचं जीवन, त्यांच्या समस्या आणि संस्कृतीशीही जवळून समजून घेतली पाहिजे… याच भावनेतून राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ‘आपुलकीचा मुक्काम’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. तालुक्यातील आंबवली, देऊळवाडी येथून या उपक्रमाची सुरुवात झाली. विशेष म्हणजे, देशसेवेसाठी भारतीय सैन्यदलात योगदान दिलेल्या यादव कुटुंबीयांच्या तब्बल ६० वर्षे जुन्या पारंपरिक कोकणी घरात त्यांनी मुक्काम केला.
आपल्या माणसांत… आपल्या वस्तीवर… राजकीय औपचारिकतेच्या पलीकडे जाऊन थेट जनतेच्या घरात मुक्काम ! राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या ‘आपुलकीचा मुक्काम’ या उपक्रमाची सुरुवात खेड तालुक्यातील आंबवली, देऊळवाडी येथून झाली.संध्याकाळी उशिरा योगेश कदम गावातील वस्तीवर पोहोचताच ग्रामस्थांनी त्यांचं उत्साहात आणि आपुलकीने स्वागत केलं. यावेळी त्यांनी देशसेवेसाठी भारतीय सैन्यदलात योगदान दिलेल्या यादव कुटुंबीयांच्या ६० वर्षे जुन्या पारंपरिक कोकणी वास्तूमध्ये मुक्काम केला.
कोकणच्या पारंपरिक घराची ऊब… साधी राहणी… स्थानिक खाद्यसंस्कृती… आणि माणसांमधील जिव्हाळा ! या सगळ्याचा अनुभव घेताना योगेश कदम यांनी यादव कुटुंबीयांसह ग्रामस्थांशी मनमोकळा संवाद साधला.
या संवादातून सैन्यदलातील सेवेच्या आठवणी, गावाचा इतिहास, बदलती जीवनशैली आणि ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनातील सुख-दुःख जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. राजकीय व्यासपीठावरून संवाद साधण्याऐवजी थेट गावकऱ्यांच्या घरात राहून त्यांचं जगणं समजून घेण्याची ही संकल्पना सध्या लक्षवेधी ठरत आहे. विकासकामांसोबतच नागरिकांच्या जीवनमानाचा आणि त्यांच्या जीवनपद्धतीचा जवळून अनुभव घेता यावा, या उद्देशाने ‘आपुलकीचा मुक्काम’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गावातील माणसांमध्ये राहून त्यांच्या अपेक्षा, अडचणी आणि भावना समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. पहिल्याच मुक्कामात ग्रामस्थांकडून मिळालेली आपुलकी आणि माणुसकीची ऊब कायम स्मरणात राहील, अशी भावना मंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला
विकासाच्या गप्पांपलीकडे जाऊन गावकऱ्यांच्या घरात मुक्काम… त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न… आणि कोकणच्या मातीशी नातं अधिक घट्ट करण्याची संकल्पना ! ‘आपुलकीचा मुक्काम’ या उपक्रमातून मंत्री योगेश कदम यांनी जनतेशी संवाद साधण्याचा एक वेगळा मार्ग निवडला आहे.
आपल्या माणसांत, आपल्या वस्तीवर! मंत्री योगेश कदम यांचा ‘आपुलकीचा मुक्काम’!
