मुंबई : भारतीय संविधान समजून घेण्यासाठी केवळ त्यातील कलमे आणि न्यायालयीन निर्णयांचा अभ्यास पुरेसा नसून, संविधानामागील तत्त्वज्ञान, मूल्ये आणि मूलभूत सिद्धांत समजून घेणे आवश्यक आहे, असे मत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित लेखक रमेश पतंगे यांनी व्यक्त केले. कालीना येथील मुंबई विद्यापीठ परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवात ते बोलत होते.

संविधानाचा अभ्यास मुख्यत्वे दोन दृष्टिकोनांतून करता येतो. त्यातील पहिला म्हणजे संवैधानिक कायदा, तर दुसरा म्हणजे संविधानाचा वैचारिक आणि तात्त्विक अभ्यास, असे पतंगे यांनी सांगितले.

संवैधानिक कायद्याच्या क्षेत्रात सात खंडांचा एक प्रमाणित ग्रंथ उपलब्ध असून, न्यायालयात वकिली करणाऱ्यांसाठी तो महत्त्वाचा आहे. मात्र, संविधानाची व्यापक आणि वास्तविक समज विकसित करण्यासाठी त्यामागील मूलभूत तत्त्वांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.