चिपळूण : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सावरकर सभागृहात इंडियन मेडिकल असोसिएशन आणि वुमन्स डॉक्टर विंग, चिपळूण शाखेतर्फे नुकत्याच प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कष्टकरी महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
डॉ. अंजली शारंगपाणी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. ॲडव्होकेट वृषाली सावंत यांनी महिलांची सुरक्षा आणि सायबर क्राईम या विषयावर मार्गदर्शन करत डिजिटल युगात महिलांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. समीना दलवाई यांनी मासिक पाळीतील तक्रारी, बदल, लक्षणे व उपचार याविषयी मार्गदर्शन केले. तसेच मेनोपॉजच्या काळात होणाऱ्या शारीरिक-मानसिक बदलांचा योग्य प्रकारे सामना कसा करावा, याविषयीही त्यांनी माहिती दिली.
यावेळी आपल्या मेहनतीच्या जोरावर फ्रीडायविंग या अनोख्या जलक्रीडेत उल्लेखनीय यश मिळवीलेल्या समृद्धी देवळेकर हिचा विशेष सन्मान करण्यात आला. समृद्धी ही प्रमाणित फ्रीडायविंग इन्स्ट्रक्टर बनली असून अशी मान्यता मिळवणाऱ्यांपैकी ती भारतातील मोजक्या व्यक्तींमध्ये गणली जाते.
याचबरोबर तीन वर्षांचे आलीम शिक्षण पूर्ण करत पदवी शिक्षण घेत असताना वक्तृत्व, निबंध, कथा कथन आणि पुस्तक परीक्षण स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या कालुस्ते खुर्द येथील समरीन जमालुद्दीन कादरी हिचाही सन्मान करण्यात आला. आहे. तसेच श्रम साफल्य महिला स्वयंसहायता संघाच्या सचिव पल्लवी रहाटे आणि चिपळूण पंचायत समितीच्या हॉटेल कँटीन चालक सारिका मेढेकर या कष्टकरी महिलांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या डॉ. रहिमत जबले यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, आयएमएचे चेअरमन डॉ. अब्बास जबले, सेक्रेटरी डॉ. अरविंद पोतदार, वुमन्स डॉक्टर विंगच्या चेअरमन डॉ. मनीषा वाघमारे, व्हाईस चेअरमन डॉ. वनिता सानप, डॉ. कांचन मदार, डॉ. वर्षा रिळकर, डॉ. अश्विनी गणपते, डॉ. श्रुतिका कुतकुंडे, डॉ. साक्षी मोहिते, डॉ. गरुड, डॉ. शमीना परकार, शहिदा शेखदारे, खंदारे, सुनीता महाडिक, दीपक महाडिक, शैला आखाडे तसेच परिचारिका व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.