चिपळूण : परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची सखोल तपासणी करून त्यांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने अपरान्त हॉस्पिटल व माधवबाग क्लिनिक, चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष ‘टोटल हेल्थ रिस्क असेसमेंट’ आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .हे शिबिर बुधवारी (दि. २५ मार्च) सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत भोगाळे येथील अपरान्त हॉस्पिटलमध्ये उत्साहात पार पडले.
शिबिराचे उद्घाटन नवनिर्वाचित नगरसेवक व बांधकाम सभापती श्री कपिल शिर्के व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. उस्मान बांगी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत श्री उदय वेल्हाळ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत अपरान्त हॉस्पिटलचे संचालक डॉ. यतिन जाधव तसेच डॉ. अब्बास जबले यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.या शिबिरा दरम्यान जेष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाढत्या वयानुसार उद्भवणाऱ्या विविध आजारांचा विचार करून या शिबिरात ज्येष्ठ नागरिकांची सर्वंकष तपासणी करण्यात आली. हृदयविकार, हृदयातील ब्लॉकेजेस, मधुमेह, श्वसनविकार तसेच स्त्रीरोग यांसारख्या आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांकडून सखोल तपासणी व आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रत्येक सहभागी नागरिकाच्या आरोग्य जोखमींचे मूल्यांकन करून त्यांना योग्य उपचारपद्धती व जीवनशैली विषयक सल्लाही देण्यात आला.शिबिरामध्ये संगणकीय स्पायरोमेट्री (श्र्वसन क्षमता चाचणी) इसीजी, रक्तदाब व हार्टरेटमापन, शरीरातील ऑक्सिजन चा पुरवठा Spo2 तपासणी, हाडांची ठिसूळता तपासणी (BMD) अशा आधुनिक चाचण्यांचा समावेश करण्यात आला होता.
या शिवाय डॉक्टर आपल्या घरी ही विषेश सुविधा अंतर्गत २४×७ डॉक्टर ऑन कॉल, घरबसल्या पॅथाॅलाॅजी चाचण्या, फिजिओथेरपी सेवा तसेच ऑनकाॅल एम्बूलन्स सेवा अपरान्त हॉस्पिटल प्रशासनाने उपलब्ध करून दिली होती.
या शिबिरात डॉ. भक्ति पालांडे, डॉ. सदगुरु पाटणकर, डॉ. सौरभ सुर्वे, डॉ. ओमकार खोत, डॉ. पूजा यादव, डॉ. प्राची हरवंदे, आहारतज्ञ डॉ. ऋषिकेश बर्वे फिजिओथेरपीस्ट सुर्वे मॅडम तसेच माधवबागच्या डॉ. स्नेहल नांगरे यांही तपासणी व मार्गदर्शन याकरिता उपलब्ध होत्या.
या उपक्रमाला मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकाच ठिकाणी विविध तपासण्या व तज्ज्ञांचा सल्ला मिळाल्याने सहभागी नागरिकांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबवून नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.
अपरान्त हॉस्पिटल व माधवबाग क्लिनिक चिपळूण यांचा संयुक्त उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी टोटल हेल्थ रिस्क असेसमेंट शिबिर उत्साहात संपन्न
