पुणे : स्वातंत्र्यपूर्व काळात इ. स. 1894 साली स्थापन झालेल्या आणि मराठी भाषा, साहित्यविषयक कार्य करणारी आद्य संस्था म्हणून लौकिक असलेल्या ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे’चे 13 वे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार, संपादक, साहित्यिक आणि प्रख्यात वक्ते डॉ. सागर देशपांडे यांची एकमताने निवड करण्यात आली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेते लोकमान्य टिळक, न्या. महादेव गोविंद रानडे, डॉ. रामकृष्ण भांडारकर, साहित्यिक ह. ना. आपटे यांनी ही संस्था स्थापन केली होती. डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती आणि ख्यातनाम मूर्तीशास्त्रज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे राजीनामा दिल्यानंतर डॉ. देशपांडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष डॉ. अरविंद नवरे हे होते.
1894 मध्ये डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी या नावाने स्थापन झालेल्या या संस्थेचे 1948 मध्ये महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था असे नामकरण करण्यात आले. प्रख्यात प्राच्यविद्या संशोधक आणि मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय उपकुलपती डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, रावबहाद्दूर का. ना. साने, इचलकरंजी संस्थानाचे महाराज श्रीमंत बाबासाहेब घोरपडे, फलटणचे राजे श्रीमंत सर मालोजीराव नाईक-निंबाळकर, रँग्लर डॉ. गणेश स. महाजनी, न्या विद्याधर ओक, लो. टिळक यांचे नातू आणि महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती जयंतराव टिळक, भारताचे माजी सरन्यायाधीश न्या. वाय. व्ही. चंद्रचूड, माजी पोलिस आयुक्त श्रीधर मराठे, मनोहर देशपांडे, प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे आणि डॉ. गो. बं. देगलूरकर अशी या संस्थेच्या अध्यक्षांची उज्ज्वल परंपरा आहे. महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेच्या कार्यकारिणी सभेने डॉ. सागर देशपांडे यांचे गेल्या 40 वर्षातील पत्रकारिता, मराठी भाषा, साहित्य, शिक्षण आणि समाजप्रबोधनाच्या कार्यातील योगदान लक्षात घेऊन एकमताने संस्थेचे नूतन अध्यक्ष म्हणून निवड केली. डॉ. देशपांडे हे गेली 22 वर्षे जडण-घडण या पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या मासिकाचे मुख्य संपादक आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासह 20 पुरस्कार मिळाले असून त्यांनी लिहिलेल्या 14 ग्रंथांपैकी काही ग्रंथांनाही साहित्यविषयक पुरस्कार मिळाले आहेत.
विद्येचा प्रसार मराठी भाषेत करणे, उत्कृष्ट आणि उपयुक्त पुस्तकांचे मराठी अन्य भाषांमध्ये अनुवाद करणे, मराठी ग्रंथांचे परीक्षण करून त्यांना पारितोषिके देणे, मराठी भाषेच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न करणे, मराठी भाषा आणि साहित्य यासाठी संशोधन करणे आदि उद्दिष्टांसाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने इतिहासाचार्य राजवाडे, कृष्णराव अर्जुन केळुस्कर, वासुदेवराव खरे, रे. ना. वा. टिळक, भारतत्न डॉ. पां. वा. काणे, त्रिंबक नारायण अत्रे, नाथ माधव, ‘काळ’चे शि. म. परांजपे, कवी केशवसुत, भा. रा. तांबे, श्री. म. माटे, ग. ह. खरे, साने गुरुजी, श्री. ना. पेंडसे, बाळशास्त्री हरदास, काकासाहेब गाडगीळ, ना. ग. गोरे. भारताचार्य चिंतामणराव वैद्य, गिरीजाबाई केळकर, विनायकराव ओक अशा दिग्गजांना ग्रंथ पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
संस्थेच्या संग्रहात शतकापूर्वीचे अनेक दुर्मिळ ग्रंथ, रोजनिशा, नियतकालिके, पेशवे दप्तर, न्या. रानडे अध्यासन, जुनी कागदपत्रे, पत्रव्यवहार इ. मौलिक साहित्य असून वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येतात. संस्थेकडील काही महत्त्वाच्या ग्रंथांचे एम. के. सी. एल. च्या सहयोगाने डिजिटलायजेशनही झाले आहे. अलिकडेच 7 वर्षांपूर्वी संस्थेचा शतकोत्तर रौप्य महोत्सव आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि डॉ. देगलूरकर यांच्या उपस्थितीत पार पडला होता.
संस्थेचा लौकिक वाढवण्यासाठी आणि संस्थापक, आजपर्यंतचे दिग्गज अध्यक्ष यांच्या योगदानाचे स्मरण ठेवून मराठी भाषा, साहित्य, संशोधन क्षेत्रात संस्थेला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी कालसुसंगत प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने करूया असे आवाहन नूतन अध्यक्ष डॉ. सागर देशपांडे यांनी केले.
132 वर्षांपासून कार्यरत असलेल्यामहाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. सागर देशपांडे
