खेड : शहराजवळील भोस्ते–शिव–कोंडवली–बोरज इजिमा ३३ या मार्गावर सुरू होणाऱ्या रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे एस.टी.सह सर्व लहान-मोठ्या वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी (स्थापत्य), जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, खेड यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात अधिकृत पत्र जारी करण्यात आले आहे.

सदर पत्रानुसार, या मार्गावरील रेल्वे स्टेशन ते भोस्ते विराचीवाडी दरम्यान रस्ता दुरुस्तीचे काम दिनांक ७ एप्रिल २०२६ पासून हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावर मंगळवार, दिनांक ७ एप्रिल ते १० एप्रिल २०२६ या कालावधीत एस.टी. बससह सर्व लहान-मोठ्या वाहनांची वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे या मार्गावरून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोय होण्याची शक्यता आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था शोधावी लागणार आहे. दरम्यान, संबंधित विभागाने राज्य परिवहन मंडळाच्या आगार व्यवस्थापकांसह तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि संबंधित ग्रामपंचायतींना याबाबत माहिती दिली असून, आवश्यक त्या पुढील कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे