चिपळूण : चिपळूण येथील फॉरेस्ट विभागाच्या शासकीय मालमत्तेच्या भिंतीवर सत्ताधारी पक्षाचे चिन्ह काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग,काँग्रेस नगरसेवक गटनेते साजिद सरगुरोह, नगरसेविका सफा गोटे आणि सुरेश पाथरे यांनी संबंधित फॉरेस्ट अधिकाऱ्यांची भेट घेत जाब विचारला. शासकीय मालमत्तेवर कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह लावणे नियमबाह्य असल्याचे सांगत, “सरकारी जागेचा राजकीय वापर कसा काय केला जातो?” असा सवाल काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
तसेच संबंधित चिन्ह तात्काळ हटवून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली. दरम्यान, फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकार्यांनाही निवेदन सादर केले आहे. यावेळी समन्वयक सुरेश कातकर, खेड काँग्रेस तालुका अध्यक्ष अजीम सुर्वे, कार्याध्यक्ष फैसल देसाई, प्रफुल्ल शेवरकर, चिपळूणचे कैसर देसाई, वीणा जावकर, निर्मला जाधव, महादेव चव्हाण,सुरेश पाथरे, संजय जाधव आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
