खेड :- तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील लोटे गावातील तुकाराम घाग यांच्या चाळीत राहणारा फारुख हुसैन अख्तर अन्सारी (वय २२, मूळ रा. डेनमारवा, चंपारण, राज्य बिहार) याचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. ७/४/२०२६ रोजी सायं. १४:५८ वाजता घडली.
याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. याबाबतची खबर मोहम्मद शहाबुद्दीन अन्सारी यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खबर देणारे मोहम्मद शहाबुद्दीन अन्सारी यांचा चुलत भाऊ, मयत फारुख हुसैन अख्तर अन्सारी (वय २२) हा लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील ड्राफ्ट केबल कंपनीमध्ये कामाला जाणार होता. मात्र तो कामावर न गेल्याने त्याचा मित्र अवधेश कुशवाह दुपारी त्याच्या घरी आला. त्यांनी चाळ मालकांकडून दरवाजा उघडून आत प्रवेश करून पाहिले असता, फारुख हुसैन अख्तर अन्सारी याने गमछ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी ही माहिती खबर देणाऱ्यास कळविली.
मयतास कळंबणी बुद्रुक येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. या आकस्मिक मृत्यूचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.