शिरगाव ( निसार शेख): शिरगांव ग्रामस्थ श्री. सुरजराव शिंदे यांनी कुंभार्ली घाटात अनेक वर्षांपासून दररोज वाहन चालक व प्रवाशांची होणारी गैरसोय आमदार श्री. शेखर निकम साहेब यांच्या निदर्शनात आणून दिली. सदरच्या समस्येवर घाटात भोगदा ( Tunnel ) काढल्याशिवाय पर्याय निघणार नाही हे पटउन दिले.
त्यावेळी तेथील भौगोलिक परिस्थिती पाहता समांतर पातळीवर बोगदा ( Tunnel ) होणे आवश्यक आहे त्यासाठी सोनपात्र मंदीर ते घाटमाथा पर्यंत चे अंतर श्री. सुरजराव शिंदे यांनी घेण्याचे सुचवले तसे केले असता भविष्यात तांत्रिक अडचणी येणार नाहीत व काम जलद गतीने विना अडथळा पुर्ण करता येईल यावर एकमत झाले.
वरील चर्चे नुसार आमदार महोदयांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना शिफारस केली असता त्याची तत्काळ दखल मंत्रीमहोदयांनी घेतली त्यासाठी श्री. सुरजराव शिंदे यांनी मंत्रीमहोदयांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेतली व Tunnel सर्वेक्षण जलद गतीने करण्याची विनंती केली त्याची तत्काळ दखल घेऊन मंत्रीमहोदयांनी मा. मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग, महाराष्ट्र यांना निर्देश दिले. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर – चिपळूण – कराड – विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रं. १६६ ई हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मार्ग आहे जो कोकणातील गुहागर ते सोलापूरला जोडतो. सदरच्या महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील ” कुंभार्ली घाट ” हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा प्रमुख दुवा आहे. जो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूक सुलभ करतो.
कुंभार्ली घाटातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते सदरचा घाट रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडीला नेहमी सामोरे जावे लागत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना आणि लहान – मोठ्या व्यापारी वाहनचालकांना सोसावा लागतो. कुंभार्ली घाट रस्त्यात अपघाताचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणात वाढत चालले असून स्थानिक प्रशासन हतबल झाले आहे. त्याचबरोबर घाट रस्ता अरुंद असल्याने वेळेत डागडूजी करणे ही शक्य होत नसून डागडुजीच्या वेळी अनेक वेळा वाहतूक बंद ठेवावी लागते. कुंभार्ली घाटातील सोनपात्र मंदीर ते घाटमाथा पर्यंत भुयारी मार्ग ( Tunnel ) उभारला असता त्याचा खूप मोठा दिलासा स्थानिक प्रशासनाला व वाहतूक धारकांना होईल. तसेच घाट रस्त्याला पर्यायी मार्ग मिळेल त्याने भविष्यात कमी वेळात घाट पार करता येईल.
