पुणे, – नसरापूर येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून समाजमनाला हादरवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पुणे येथील धायरी येथे जाऊन पीडित मुलीच्या पालकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांच्याशी संवाद साधला. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास दिला.
सदर प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यात येणार असून यासाठी विशेष सरकारी वकील नेमण्यात येणार आहे. तसेच पॉक्सो कायद्यानुसार आरोपीस अत्यंत कठोर शिक्षा मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित यंत्रणांना कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले असून, दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा ठाम इशाराही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिला.