चिपळूण : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील ६ महिने गरोदर विवाहितेचा एक लाख रुपयाच्या मागणीसाठी छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी आरोपी पती दिनेश महादेव कदम वय ३४ वर्षे व सासू मिनाक्षी महादेव कदम वय ५७ वर्षे या दोन्ही आरोपींना भा.दं.वि कलम ४९८ (अ), ३०६ सह ३४ या गुन्ह्याखाली दोषी धरून १० वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ३५ हजार रूपये दंड व दंड न भरल्यास प्रत्येकी ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा आज ठोठावली.

या न्यायनिर्णयाने पीडितेला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याची भावना मयत काव्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. या शिक्षेमुळे हुंडाबळी व कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांवर होणा-या अत्याचारामध्ये कायद्याचा धाक बसून अशा गुन्ह्यामध्ये घट होईल अशी प्रतिक्रिया सरकारी
वकीलांनी दिली. सत्र खटल्याकामी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील साळवी यांनी काम पाहिले तसेच तपासिक अंमलदार पोलीस निरीक्षक शरद कुवेस्कर व सचिन इंगोले यांनी गुन्ह्याचा सखोल तपास केला व पैरवी अधिकारी म्हणून पो. हवालदार मिनाद कांबळे यांनी
काम पाहिले.