मंडणगड : काजू उत्पादनाला प्रक्रिया उद्योगाची जोड देत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने मंडणगड तालुक्यातील कळकवणे येथील मिलिंद ॲग्रो काजू युनिट महत्त्वपूर्ण ठरत आहे. या युनिटला भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी सेवा संकल्प अभियानांतर्गतभेट देत उद्योजक मिलिंद पवार यांच्या कार्याचे कौतुक केले. या भेटीदरम्यान देवळेकर यांनी काजू प्रक्रिया उद्योगाची माहिती घेतली.

“स्थानिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून उभारले जाणारे उद्योग हे कोकणच्या आर्थिक विकासाचे आधारस्तंभ आहेत. मिलिंद पवार यांचा उद्योजकीय प्रयत्न ग्रामीण युवकांसाठी प्रेरणादायी आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. काजूला प्रक्रिया, गुणवत्ता आणि व्यापक बाजारपेठेची जोड मिळाल्यास स्थानिक उत्पादनांचे मूल्यवर्धन होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते. युवकांनी नोकरीच्या संधींसोबतच स्थानिक साधनसंपत्तीवर आधारित उद्योग-व्यवसायाकडेही सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन देवळेकर यांनी केले. स्थानिक उत्पादनांना उद्योगाची जोड, युवकांना स्वावलंबनाची प्रेरणा आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी—यातूनच विकसित मंडणगड ची वाटचाल अधिक गतिमान होईल, असा संदेश या भेटीचे वेळी मिलिंद पवार यांनी दिला.