खोपोली : कर्जत-खोपोली मार्गावरील केळवलीजवळ एका कारने अचानक पेट घेतल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच खोपोली अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यानंतर मदत यंत्रणांच्या प्रयत्नांमुळे या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली. ही घटना आज, रविवारी, दुपारी एकच्या सुमारास घडली. कारला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.