लांजा : (गोविंद चव्हाण) आगामी एसआयआर मोहिमेच्या अनुषंगाने लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघातील लांजा तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज करण्याच्या उद्देशाने २५ जून रोजी लांजा शहरातील संकल्पसिद्धी हॉल येथे बीएलओंचा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.

या प्रशिक्षणास बीएलओ, बीएलओ सहाय्यक तसेच सर्व पर्यवेक्षक उपस्थित होते. प्रशिक्षणादरम्यान मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत अचूकता, पारदर्शकता आणि वेळेत कामकाज पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड तसेच मतदार नोंदणी अधिकारी विश्वजीत गाताडे यांनी प्रशिक्षणस्थळी उपस्थित राहून प्रशिक्षणार्थींना एसआयआर मोहिमेची उद्दिष्टे, मतदार नोंदणी व पडताळणीची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची तपासणी तसेच प्रत्यक्ष कामकाजादरम्यान घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. आगामी मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी जबाबदारीने व काटेकोरपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमास लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, गटविकास अधिकारी हिंदूराव गिरी, लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, निवडणूक नायब तहसीलदार दर्शन देसाई, निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी, तालुका कृषी अधिकारी अभिजीत शेलार तसेच सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.