लांजा : (गोविंद चव्हाण) गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यात विविध ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नाही.
गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. सोमवारी सकाळी आसगे मांडवकरवाडी येथील दत्त मंदिराच्या परिसरात उभ्या असलेल्या कारवर अचानक वडाचे झाड कोसळले. झाडाच्या वजनामुळे कारचे मोठे नुकसान झाले.
तसेच, व्हेळ–पाचळ मार्गावर सोमवारी सकाळी झाड कोसळल्याने वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला. ग्रामस्थांनी तत्परता दाखवत झाड बाजूला केल्याने वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. दरम्यान, पावसाच्या जोरामुळे पन्हळे येथील कुडकरवाडीमध्ये संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. तसेच, चाफेट येथे मंगला गुणे यांच्या घरावर फणसाच्या झाडाची मोठी फांदी पडल्याने घराच्या पडवीवरील सिमेंटची पत्रे फुटून नुकसान झाले.
दरम्यान, लांजा तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळणे, संरक्षक भिंतींची पडझड होणे तसेच वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
