मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षा CBT (Computer Based Test) पद्धतीने घेण्याचा तसेच Normalization पद्धत लागू करण्याचा घेतलेला निर्णय राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय आहे. या निर्णयाविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दुपारी १२ वाजता सीबीडी बेलापूर येथील MPSC मुख्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसादात सुरुवात झाली.
आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी तसेच राज्याच्या विविध भागांतून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या न्याय्य लढ्याला भक्कम पाठिंबा दिला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या या मागणीला सक्रिय पाठिंबा दिला आहे. अधिवेशनातही महाविकास आघाडीच्या आमदारांनी हा प्रश्न प्रभावीपणे सभागृहात मांडला. याशिवाय MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून काँग्रेसचे प्रतिनिधी, विद्यार्थी व विविध विद्यार्थी संघटनांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती दोन वेळा करण्यात आली होती. मात्र, त्यास कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही.