लोटे : – घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल, ता. खेड येथील संगणक अभियांत्रिकी विभागाचा विद्यार्थी सोहन सुधीर चव्हाण याची देशातील अग्रगण्य आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये असिस्टंट सिस्टीम इंजिनियर ( ट्रेनी ) पदासाठी निवड झाली आहे. त्याची ही निवड संस्था, विभाग आणि संपूर्ण परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
सोहनने आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत सातत्यपूर्ण मेहनत, तांत्रिक कौशल्ये आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. टी सी एस च्या कठीण निवड प्रक्रियेत यशस्वी होत त्याने आपले स्थान निश्चित केले आहे.
संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांसाठी ही निवड प्रेरणादायी ठरत असून, योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमध्ये संधी मिळू शकते, हे सोहनने सिद्ध करून दाखवले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रमोद पाटील, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख डॉ. समीर ताठरे, संगणक अभियांत्रिकी विभागाच्या विभागप्रमुख डॉ. (सौ.) जे. व्ही. खालकर तसेच सर्व प्राध्यापकांनी सोहन चव्हाण यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या उज्ज्वल व्यावसायिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सोहनच्या या यशामुळे घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संगणक अभियांत्रिकी विभागाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीच्या प्रयत्नांची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून भविष्यात अधिकाधिक विद्यार्थी नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्थान मिळवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.