रायगड : अलिबाग–पेझारी–वडखळ मार्गावर आज सकाळी शिवशाही बस क्रमांक MH 06 BW 4335 चा गंभीर अपघात झाला. अलिबागहून पनवेलकडे जात असताना बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली पलटली. या अपघातात बसमधील सुमारे 40 प्रवासी सुदैवाने बचावले असून मोठा अनर्थ टळला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, बस पलटल्यानंतर काही प्रवाशांनी बसच्या काचा फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि मदत पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.
अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे अलिबाग–पनवेल मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.