दापोली : दापोली तालुक्यातील मुदत संपलेल्या तसेच २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ६९ ग्रामपंचायतींसाठी गुरुवारी (१२ जून) प्रभागरचना व सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सकाळी ११ वाजता संबंधित ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामस्थ, इच्छुक उमेदवार, माजी पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली. या सोडतीनंतर तालुक्यातील राजकीय वातावरणात चांगलीच खळबळ उडाली असून, आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

या आरक्षण सोडतीद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग तसेच महिला आरक्षणाच्या जागा निश्चित करण्यात आल्या. अनेक ग्रामपंचायतींमध्ये विद्यमान सदस्य किंवा माजी पदाधिकाऱ्यांच्या प्रभागांमध्ये आरक्षण बदलल्याने त्यांच्या राजकीय गणितांना धक्का बसला आहे. तर काही ठिकाणी आरक्षण अनुकूल ठरल्याने इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

लाडघर, आंजर्ले, हर्णे, साखळोळी, खेर्डी, कर्दे, नानटे, गव्हे, आसूद, पालगड, बुरोंडी, कोळथरे, चिखलगाव, पन्हाळेकाजी, दाभोळ, मुरूड, केळशी, शिरसोली, वाघवली, करंजाळी, माटवण, आडे, आवाशी यांसह तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण जाहीर होताच त्याची चर्चा गावागावांत सुरू झाली. अनेक ठिकाणी ग्रामसभेनंतर इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी बैठकांचे सत्र सुरू केले. काही गावांमध्ये संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा रंगू लागली असून, निवडणुकीपूर्वीच प्रचाराची अनौपचारिक सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे.