खेड : तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत होणाऱ्या पीफास (PFAS) उत्पादनाच्या विरोधात सोमवार, दि. ६ एप्रिल रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या शांततामय मोर्चाला पोलिस प्रशासनाने परवानगी दिली आहे. कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती तसेच परिसरातील सर्व स्थानिक नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत होणाऱ्या पीफाससारख्या घातक रसायनांच्या उत्पादनामुळे पर्यावरण, पाणी, माती आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, पर्यावरण व आरोग्य रक्षणासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मोर्चाद्वारे पीफाससारख्या घातक रसायनांचे उत्पादन तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
तसेच परिसरातील प्रदूषणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, दूषित पाणी, माती व आरोग्यावर झालेल्या परिणामांबाबत स्वतंत्र वैज्ञानिक अहवाल जाहीर करावा आणि स्थानिक ग्रामस्थांचे स्वच्छ पाणी व आरोग्य सुरक्षित ठेवावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय तात्काळ जनसुनावणी आयोजित करून स्थानिकांचे मत विचारात घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
“आपण येणार – मोर्चा यशस्वी करणार!” या घोषणेसह आयोजकांनी सर्व ग्रामस्थ, तरुण, महिला, शेतकरी, मासेमार बांधव, कामगार आणि विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. आपल्या जमिनी, पाणी, हवा आणि पुढील पिढ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी हा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मोर्चामध्ये इटली येथील एका महिलेचाही सहभाग असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या आंतरराष्ट्रीय सहभागामुळे या आंदोलनाकडे अधिक लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे.
मोर्चा शांततेत आणि शिस्तीत पार पडावा यासाठी पोलिसांकडून आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, प्रशासन व आयोजक यांच्यात समन्वय साधला जात आहे. या मोर्चामुळे परिसरातील पर्यावरणीय प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.