मुंबई – पुण्याचा वाढता विस्तार आणि त्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे-शिरूर,तळेगाव-चाकण-
शिक्रापूर व हडपसर-यवत या तीन उन्नत महामार्ग प्रकल्पांमुळे पुण्याच्या विकासाला नवी गती मिळेल आणि हे मार्ग खऱ्या अर्थाने ‘गेम चेंजर’ ठरतील असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.

पुणे जिल्ह्याच्या पायाभूत विकासाला नवी गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आज शुभारंभ झाला.

दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्व व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागल्याचेही सुनेत्रा पवार यांनी यावेळी नमूद केले.

पुणे-शिरूर उन्नत मार्ग अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि बहुविध वाहतूक जोडणी या संकल्पनेवर आधारित असून, त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुकर होणार आहे. हडपसर-यवत मार्गामुळे वाहतुकीचा ताण कमी होऊन वेळेची बचत होईल, तर तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गामुळे औद्योगिक पट्ट्याला आधुनिक रस्ते संपर्क उपलब्ध होऊन मालवाहतुकीला वेग मिळेल तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

पुणे हे केवळ विद्येचे माहेरघर नसून उद्योग, तंत्रज्ञान आणि रोजगाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहे. पुणे मेट्रो, रिंग रोड, विमानतळाच्या नवीन टर्मिनलचा विस्तार, पिंपरी-चिंचवड व हिंजवडी आयटी पार्कचा विस्तार तसेच चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे काम प्रभावीपणे सुरू असल्याचे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

नाशिक फाटा ते राजगुरूनगर उन्नत महामार्ग हा पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे सांगत भूसंपादनातील तांत्रिक अडचणी दूर करून हा प्रकल्पही लवकरात लवकर मार्गी लावावा, अशा सूचनाही सुनेत्रा पवार यांनी दिल्या.