तिबेट : तिबेटमध्ये गुरुवारी (२२ ऑक्टोबर) रात्री ८ वाजताच्या दरम्यान भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सेसनुसार, गुरुवारी तिबेटच्या भागात ७.० रिश्टर स्केल तीव्रतेचे शक्तिशाली भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हा भूकंप जमिनीपासून १० किमी इतक्या कमी खोलीवर झाला आहे. या भूकंपामुळे झालेले नुकसान किंवा जीवितहानी याबाबत अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही.

उत्तर तिबेटमधील नागकू (Nagqu) या भागात भूकंपाचे धक्के बसले आहेत. सीईएनसीच्या नोंदीनुसार भूकंपाची खोली जमिनीखाली १० किलोमीटर होती. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू तिबेटची राजधानी ल्हासा शहरापासून सुमारे ४०० किमी अंतरावर होता. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, नेपाळ-चीन सीमेवरील डोंगराळ भागात विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाल्याच्या घटनेनंतर काही आठवड्यांनंतरच हा भूकंप झाला आहे. नेपाळमधील नैसर्गिक आपत्तींमध्ये १ हजार ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं, तसेच अद्यापही शेकडो लोक बेपत्ता आहेत. दरम्यान, आता तिबेटमध्ये गुरुवारी झालेल्या या भूकंपामुळे जीवितहानी किंवा मालमत्तेचं किती नुकसान झालं, याबाबत अद्याप कोणतीही तात्काळ माहिती मिळालेली नाही. याबाबत अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.

तिबेटमध्ये एका वर्षापूर्वीही झाला होता भूकंप

तिबेटमध्ये २०२५ मध्ये सुमारे ७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. अनेक घरे बाधित झाले होते. तेव्हा भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळजवळ होता. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार गेल्या शतकात या प्रभावित भागात ६ किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेचे किमान १० भूकंप झाले आहेत.