मुंबई : अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने जनाब संजय राऊतांना मिरची झोंबली आहे. संजय राऊत, अभी तो ये शुरुआत है. येत्या काळात तुम्हाला अनेक मिरच्या झोंबणार आहेत, कारण असे अनेक विक्रम महाराष्ट्राच्या आणि मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नावावर होत उद्या जगभरातून महाराष्ट्रातल्या चांगल्या कामाचे कौतुक होणार आहे. तुमचे मालक अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना तुमच्यासोबत असलेल्या शरद पवार साहेबांनाही तुमचे कौतुक करावेसे वाटले नाही. उलट त्यांनी तुमच्यावर टीका केली होती. हे एकदा संजय राऊतांनी आठवावे, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देवेंद्रजी फडणवीस यशस्वी मुख्यमंत्री असल्याचा निकाल जनतेने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राला दिलेला आहे. संजय राऊत, तुमचे मालक अयशस्वी होते. तुमचे मालक घरबशा होते. टीका केली तर लोकांना तुरुंगात डांबणारे होते. लोकांची घरे तोडणारे होते. पत्रकारांना अटक करणारे होते. देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेच्या आशीर्वादाने झालेले मुख्यमंत्री आहेत. तुमच्यासारखे ते पाठीत खंजीर खुपसून, हिंदुत्वाशी गद्दारी करून, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार बाजूला ठेवून मुख्यमंत्री झालेले नाहीत. मुंबईत कोस्टल रोड, मेट्रो, अटल सेतू प्रकल्प, मुंबईकरांना बीडीडी चाळीत हक्काचे घर स्वस्तात देणारे यशस्वी मुख्यमंत्री आहेत. तर मुंबईला लुटणारे अयशस्वी मुख्यमंत्री असतात, अशा शब्दात श्री. बन यांनी झोडपले.
संजय राऊतांना कितीही मिरच्या झोंबल्या तरी जगभरातून महाराष्ट्राचे कौतुक होणार; भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार..
