रायगड : रायगडमध्ये शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्याचा संकल्प आमदार विकास गोगावले यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेची भविष्यातील वाटचाल कोणत्याही पदासाठी नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेण्याची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात भविष्यात एकनाथ शिंदे यांच्यासारखं नेतृत्व निर्माण व्हावं, अशी इच्छाही विकास गोगावले यांनी व्यक्त केली. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, नगराध्यक्ष आणि सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन संघटना मजबूत करण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखवला.

रायगडमध्ये येणाऱ्या नवीन उद्योग आणि प्रकल्पांमधून स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देण्यावर भर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आगामी प्रकल्पांमधून सुमारे साडेचार हजार रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं गोगावले म्हणाले.

ज्या प्रकल्पांसाठी स्थानिकांच्या जमिनी जात आहेत, त्या भागातील युवकांना रोजगार मिळणं आवश्यक असल्याचं सांगत सरकारच्या धोरणानुसार 80 टक्के रोजगार स्थानिकांना मिळावा, यासाठी आजपासूनच लढा सुरू केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.