खेड : महिला बालकल्याण समिती, खेड नगरपरिषदेच्या वतीने महिलांसाठी पाईप क्लीनरपासून आकर्षक फुले बनविण्याचे मोफत प्रशिक्षण आज खेड नगरपरिषद हॉलमध्ये उत्साहात पार पडले. या प्रशिक्षणाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग नोंदविला.

या प्रशिक्षणाचे उद्घाटन खेडच्या प्रथम नागरिक माधवी बुटाला यांच्या हस्ते झाले. यावेळी उपनगराध्यक्ष पप्पू शेठ चिकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महिलांना घरबसल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू तयार करून त्यातून रोजगार व उत्पन्नाचे साधन निर्माण करता यावे, तसेच महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षक म्हणून समीक्षा जाधव यांनी महिलांना पाईप क्लीनरपासून विविध प्रकारची सुंदर फुले तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले.

महिला बालकल्याण समितीच्या सभापती रसिका खेडेकर, उपसभापती वर्षा सापटे, यांच्या संकल्पनेतून आजचे यशस्वी प्रशिक्षण झाले या वेळी दीप्ती शिगवण, अंजुम कुरणे, नीता आंब्रे, माजी समाजकल्याण सभापती रूपाली खेडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषदेच्या करमकर मॅडम तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. महिलांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा प्रकारची रोजगाराभिमुख व कौशल्यविकासाची प्रशिक्षण शिबिरे सातत्याने आयोजित करावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.