खेड : भारतीय जनता पार्टी व राजवैभव प्रतिष्ठान, खेड यांच्या वतीने यंदा ‘नमो दहीहंडी उत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवामध्ये गोविंदा पथकांसाठी आकर्षक रोख पारितोषिके, मानाची गदा, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार असून, या स्पर्धेमुळे खेड परिसरातील दहीहंडी उत्सवाला विशेष रंगत येणार आहे.
या दहीहंडी उत्सवातील विजेत्या गोविंदा पथकाला १ ,११,१११ रुपयांचे आकर्षक पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर विविध थरांसाठी स्वतंत्र रोख पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत. ८ थरांसाठी १० हजार रुपये, ७ थरांसाठी ८ हजार रुपये, ६ थरांसाठी ७ हजार रुपये आणि ५ थरांसाठी ५ हजार रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सहभागी होणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच ‘नमो श्री’ ही भव्य शरीरसौष्ठव स्पर्धाही आयोजित करण्यात आली असून, मुंबईतील नामवंत नृत्याविष्कार हे देखील या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहेत. त्यामुळे यंदाचा ‘नमो दहीहंडी उत्सव २०२६’ विविध आकर्षणांनी सजलेला ठरणार आहे.
हा भव्य दहीहंडी उत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौक, खेड येथे आयोजित करण्यात आला असून, शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजता कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.
उत्सवाच्या आयोजनामागे भारतीय जनता पार्टी व राजवैभव प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय असून, खेड परिसरातील नागरिकांनी तसेच गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. यंदाचा दहीहंडी उत्सव भव्य, उत्साहपूर्ण आणि आकर्षक ठरणार असल्याने परिसरात या कार्यक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
