चिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्याशेट बने व महिला अध्यक्ष दीपिका कोतवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण तालुक्यात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने रविवार, दिनांक २४ मे रोजी सकाळी १०.३० वाजता प्रांत कार्यालय शेजारील शिक्षक पतपेढी हॉल, हायवे, चिपळूण येथे महत्त्वपूर्ण संघटन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यातील महागाई, बेरोजगारी, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवण्यासाठी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय केदारी यांनी दिली. या बैठकीला पक्षाचे प्रदेश निरीक्षक तथा रत्नागिरी जिल्ह्याचे निरीक्षक विजय देसाई, महिला जिल्हाध्यक्ष दीपिकाताई कोतवडेकर, विविध सेल व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, सेवादल, सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. दिवंगत नेते तथा माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारे युवा नेते आमदार रोहित पाटील उपस्थित राहणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
चिपळूण तालुका व शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला आघाडी, शेतकरी, व्यापारी तसेच शरद पवार साहेबांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. बैठकीनंतर सर्व उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहितीही देण्यात आली.