खेड (प्रतिनिधी) : – राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी भेट घेऊन सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी कोकणातील आंबा बागायतदारांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल्याचा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला. या चर्चेदरम्यान अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मंत्र्यांना देऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
कोकणातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि बदलत्या हवामानामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून हंगामावर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर बाबाजीराव जाधव यांनी सहकार मंत्र्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती देत शासनाने तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. तसेच सहकार क्षेत्राशी संबंधित विविध प्रश्न, ग्रामीण भागातील सहकारी संस्थांच्या अडचणी आणि शेतकरी हिताच्या योजनांबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. कोकणातील शेतकरी आणि आंबा उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत असताना या भेटीमुळे त्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.