लांजा (गोविंद चव्हाण) : महाराष्ट्र शासन महसूल विभागामार्फत राज्यभर ‘छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्व समाधान शिबिर’ हा उपक्रम राबविण्यात आला. शासकीय योजनांचा लाभ थेट सर्वसामान्यांच्या दारी पोहोचविण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.
कोरले गावचे सुप्रसिद्ध शाहीर काशिराम जाधव यांनी लांजा तालुक्यातील कोरले व पुनस या गावांतील शिबिरामध्ये उपस्थित राहून स्वागतगीते तसेच अभियानपूरक गीते सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. लांजाच्या तहसीलदार मा. प्रियांका ढोले तसेच नायब तहसीलदार मा. गोसावी साहेब यांनी शाहीर जाधव यांना सप्रेम भेट देऊन त्यांचा गौरव केला. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याचे तहसीलदार मा. सुशीलकुमार बेल्हे तसेच नायब तहसीलदार चव्हाण साहेब यांनी टोप संभापूर, लाटवडे, पेठवडगाव आणि हातकणंगले येथे शाहीरांच्या कार्यक्रमांचे आयोजन करून उपस्थितांचा उत्साह वाढविला. कार्यक्रमप्रसंगी कोल्हापूरवासीयांनी तसेच तहसीलदार मा. सुशीलकुमार बेल्हे यांनी केलेले आदरातिथ्य हे ‘शाहिराच्या जीवनगाथेतील एक महत्त्वाचा आणि अविस्मरणीय प्रसंग’ असल्याचे शाहीरांनी सांगितले. कार्यक्रमाला खासदार मा. धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, महसूल विभाग, जिल्हा परिषद, सर्व पदाधिकारी तसेच वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
