खोपोली (दत्तात्रय शेडगे) : मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर आज सायंकाळी प्रगती गॅस एजन्सीचा सिलेंडर वाहतूक करणाऱ्या आयसर टेम्पोला भीषण आग लागल्याची घटना घडली असून, महामार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून गुजरातकडे प्रगती गॅस एजन्सीचा आयसर टेम्पो (क्रमांक: GJ 05 CW 7106) हा चालक गोलितर भारतभाई नतीभाई (वय 28, रा. सूरत, आम्रेली) हा घरगुती वापराचे 297 सिलेंडर घेऊन गुजरातकडे जात असताना, तो बोरघाटातील ढेकू गावाजवळ आला असता टेम्पोच्या टायरला भीषण आग लागली.

आग लागल्याचे चालकाच्या तात्काळ लक्षात आल्याने त्याने टेम्पो एक्सप्रेसवेच्या बाजूला थांबवून बोरघाट महामार्ग पोलिसांशी संपर्क साधला. टायरला लायनर गरम होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

बोरघाट महामार्ग वाहतूक पोलिसांना याची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आयआरबी यंत्रणा व अपघातग्रस्त टीमच्या सदस्यांच्या मदतीने अग्निशमन दलाला पाचारण करून आग विझवली. सुदैवाने ही आग टेम्पोच्या टायरपुरतीच मर्यादित राहिल्याने मोठी दुर्घटना टळली.

या घटनेची गंभीर दखल बोरघाट महामार्ग पोलीस केंद्राचे एपीआय स्वप्नील पाटील यांनी घेऊन ते तात्काळ घटनास्थळी हजर झाले. त्यांनी केमिकल एक्सपर्ट धनंजय गिध यांना बोलावून सिलेंडरची तपासणी केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे