मंडणगड : दहीहंडी उत्सवाची परंपरा व संस्कृती जपण्याच्या उद्देशाने मंडणगड शहरात कार्यरत असलेल्या ॐ साई गोविंदा पथक, मंडणगड यांना १५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ३०ऑगस्ट २०२६ आयोजित करण्यात आलेले दहीहंडी सराव शिबिर उत्साहात संपन्न झाले. सापटेवाडी येथील दुर्गा देवी मंदिर परिसरात झालेल्या या शिबिरात विविध गोविंदा पथकांनी सहभागी होत मानवी मनोरे रचण्याचा सराव केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ॐ साई गोविंदा पथकाच्या कार्याचा गौरव करणाऱ्या गौरवगीताचे अनावरण करण्यात आले. हे गौरवगीत गोविंदा पथकातील दीप जोशी यांनी गायले असून, त्याचे लेखन पत्रकार सचिन माळी यांनी केले आहे. गौरवगीताच्या अनावरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
यानंतर सहभागी गोविंदा पथकांनी दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर मानवी मनोरे रचण्याचा जोरदार सराव केला. एकमेकांच्या खांद्यावर उभे राहत थरावर थर रचताना गोविंदांमध्ये दिसणारा उत्साह, संघभावना आणि समन्वय लक्षवेधी ठरला. दहीहंडी फोडण्याच्या जिद्दीने गोविंदांनी विविध थरांचा सराव केला.
या सराव शिबिरात कन्हैया गोविंदा पथक, भिंगळोळी; जय हनुमान गोविंदा पथक, पाट; अडखळ गोविंदा पथक तसेच श्री भैरवनाथ गोविंदा पथक, दुर्गवाडी या पथकांनी सहभाग घेतला. सहभागी पथकांच्या सरावामुळे दुर्गा माता मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
पंधरा वर्षांची परंपरा
ॐ साई गोविंदा पथक मंडणगड गेल्या १५ वर्षांपासून दहीहंडी उत्सवाची परंपरा जपण्याचे काम करत आहे. केवळ दहीहंडी फोडण्यापुरता मर्यादित न राहता गोविंदा पथकांमध्ये संघभावना, शिस्त, समन्वय आणि सांस्कृतिक परंपरेची जपणूक व्हावी, या उद्देशाने सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यंदाच्या दहीहंडी उत्सवापूर्वी झालेल्या या सराव शिबिरामुळे सहभागी गोविंदा पथकांचा आत्मविश्वास वाढला असून, उत्सवासाठी गोविंदा सज्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. १५ वर्षांचा प्रवास पूर्ण करणाऱ्या ॐ साई गोविंदा पथकाने आयोजित केलेल्या या उपक्रमातून मंडणगड परिसरातील दहीहंडी संस्कृतीला नवी ऊर्जा मिळाली आहे.
