चिपळूण : परिस्थितीवर मात करत आणि आई-वडिलांच्या कष्टाचे सोने करत चिपळूण तालुक्यातील शिरळ गावच्या फारूख खतिजा लियाकत शिरळकर याने मे २०२६ मध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ (ICAI) तर्फे घेण्यात आलेल्या ‘डिप्लोमा इन इंटरनॅशनल टॅक्स’ (INTT-AT) परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक (All India Rank 1) पटकावला आहे. अत्यंत साध्या आणि सुसंस्कृत कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या फारूखच्या या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
प्राथमिक ते उच्च शिक्षणाचा यशस्वी प्रवास…
फारूख यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिपळूण येथील क्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट शाळेत दहावीपर्यंत झाले. त्यानंतर त्यांनी वाणिज्य (Commerce) शाखेचे उच्च माध्यमिक शिक्षण चिपळूणच्या नामांकित डी.बी.जे. कॉलेज (DBJ College) मधून पूर्ण केले. पुढील उच्च पदवी शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली आणि घाटकोपर येथील प्रसिद्ध सोमैया कॉलेज मधून आपले शिक्षण पूर्ण केले. अत्यंत हुशार असलेल्या फारूख यांनी २०२४ मध्ये सनदी लेखापाल ‘चार्टर्ड अकाउंटंट’ (CA) ही पदवी आपल्या पहिल्याच प्रयत्नात (First Attempt) यशस्वीपणे प्राप्त केली. ‘CA’ झाल्यानंतर ते रिलायन्स (Reliance) कंपनीत रुजू झाले.
आई-वडिलांच्या कष्टाचे केले सोने: फारूखचे कुटुंब चिपळूण तालुक्यातील शिरळ या ग्रामीण भागात राहते घरामध्ये किंवा संपूर्ण परिवारात आधी कोणाचेही फारसे उच्च शिक्षण झालेले नाही. अतिशय साधे राहणीमान आणि कौटुंबिक मर्यादा असताना ही, आई-वडिलांनी फारूखच्या शिक्षणात कोणतीही कमतरता पडू दिली नाही. आपल्या मुलाने खूप शिकावे आणि मोठे व्हावे, यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. फारूखनेही आई-वडिलांच्या या कष्टाची जाणीव ठेवून जिद्दीने अभ्यास केला आणि थेट राष्ट्रीय पातळीवर अव्वल स्थान मिळवून त्यांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने सोने केले.
सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव… आंतरराष्ट्रीय करप्रणालीशी (International Taxation) संबंधित असलेली ‘ICAI’ ची ही परीक्षा देशात अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक मानली जाते. अशा कठीण परीक्षेत ग्रामीण भागातून आलेल्या आणि रिलायन्समध्ये कार्यरत असलेल्या फारूख शिरळकरने देशात पहिला क्रमांक पटकावल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या अभूतपूर्व यशाबद्दल फारूख याच्यासह, प्रतिकूल परिस्थितीतही त्याला उच्च सुसंस्कृत संस्कार आणि शिक्षणाची गोडी लावणाऱ्या त्याच्या आई-वडिलांचे सर्व स्तरांतून, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे. त्याचे हे यश ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.