मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेत आज ई-स्पोर्ट्स विषयावर लक्षवेधीच्या माध्यमातून सविस्तर चर्चा पार पडली. आमदार श्रीकांत भारतीय यांनी महाराष्ट्रातील युवकांमध्ये वाढत असलेल्या ई-स्पोर्ट्स क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता सभागृहात ठामपणे मांडली.
चर्चेदरम्यान एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट करण्यात आला की ऑनलाईन गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स हे दोन पूर्णतः वेगळे विषय आहेत. ऑनलाईन गेमिंग हे प्रामुख्याने मनोरंजन व वैयक्तिक सहभागाशी संबंधित असते, तर ई-स्पोर्ट्स हे कौशल्याधारित, स्पर्धात्मक आणि व्यावसायिक स्वरूपाचे क्षेत्र आहे. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रांचा स्वतंत्रपणे विचार करून योग्य धोरण आखण्याची आवश्यकता आहे.
या चर्चेला उत्तर देताना मंत्री यांनी येणाऱ्या अधिवेशनापूर्वी महाराष्ट्र शासन ई-स्पोर्ट्ससाठी स्वतंत्र धोरण जाहीर करणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती सभागृहात दिली. तसेच यासाठी तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठीत करून त्यांच्या अहवालाच्या आधारे धोरण अंतिम करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.