औरंगाबाद : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या कल्याणासाठी राखीव असलेल्या निधीतील तब्बल ५ हजार कोटी रुपये लाडकी बहिण योजनेकडे वळवल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी तसेच अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांच्या वतीने आज औरंगाबाद मध्ये क्रांती चौक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात ‘जोडे मारो आंदोलन’ करण्यात आले.

२०२४ मध्ये पुन्हा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जाती-जमातींच्या कल्याणासाठी राखीव असलेल्या निधीचा वापर इतर योजनांसाठी वापर केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच नुकताच 28 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र सरकारने परत एकदा 344 कोटी रुपये पळवले आहेत. यावेळी SC, ST समूहाच्या नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला.

या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या विकासासाठी राखीव असलेला निधी इतर योजनांकडे वळवण्याचा अधिकार सरकारला कोणी दिला? या निधीचा विनियोग नेमका कुठे करण्यात आला? असा सवाल उपस्थित करत आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचा निषेध केला.

‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला जनावरांपेक्षाही वाईट वागणूक दिली आहे. आमच्या कल्याणासाठी राखीव असलेल्या निधीची चोरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना दलित आणि आदिवासी समाजातील जनता जाब विचारल्याशिवाय राहणार नाही,’ अशा तीव्र शब्दांत आंदोलकांनी आपला संताप व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला जोडे मारून सरकारविरोधात आक्रोश व्यक्त करण्यात आला. आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. अनुसूचित जाती-जमातींच्या हक्काचा निधी इतरत्र वळवण्याच्या निर्णयाविरोधात उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला.