पनवेल ( वैभव लबडे) : पनवेल पंचायत समितीवर प्रथमच भारतीय जनता पक्ष एकहाती सत्ता स्थापन करणार असून, सभापती पदासाठी रंजना सदाशिव वास्कर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. नवनिर्वाचित सभापतींना १२ मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेला उपस्थित राहता येणार आहे.
पनवेल पंचायत समितीच्या एकूण १६ जागांपैकी तब्बल १५ जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवला असून, शिवसेना (उबाठा) कडे केवळ एक जागा असल्याने भाजप प्रथमच या ठिकाणी स्वबळावर सत्ता स्थापन करत आहे.
यावेळेस सभापती पद ‘महिला (खुला प्रवर्ग)’ साठी राखीव आहे. या निवडीबाबतचा अंतिम निर्णय आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी घेतला असून, त्यांनी रंजना वास्कर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांचे पती सदाशिव वास्कर यांनी यापूर्वी कुंडेवहाळचे सरपंच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तर रंजना वास्कर यांनी कुंडेवहाळ ग्रामपंचायतीत सदस्य पदावर चांगले काम केले आहे.
1962 साली कुंडेवहाळ गावचे रहिवाशी शंकरशेठ भोईर हे काँग्रेसचे उपसभापती होते. आता पुन्हा कुंडेवहाळ गावाला सभापती पदाचा बहुमान मिळाल्याने कुंडेवहाळ व बंबावी ग्रामस्थ आनंद व्यक्त करीत आहेत. मात्र, या सभापती निवडीने निवडणुकीपूर्वी सभापती पदाची स्वप्न पाहणार्यांची स्वप्ने भंग झाली आहेत.
पनवेल समिती सभापतीपदी रंजना सदाशिव वास्कर यांच्या नावावर शिक्कामोर्तब
