गुहागर : ८ ऑगस्ट रोजी शृंगारतळी येथे पार पडलेल्या रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी स्पर्धेतून तालुक्यातील जानवळे येथील गुणवान खेळाडू स्वानंद स्वप्नील देवस्थळी याची १४ वर्षांखालील (Under-14) रत्नागिरी जिल्हा टेनिस क्रिकेट संघात प्रमुख फलंदाज म्हणून निवड करण्यात आली होती. त्याच्या उत्कृष्ट खेळ आणि नेतृत्वगुणांची दखल घेत पुढे त्याच्याकडे रत्नागिरी जिल्हा संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. आता त्याची गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नागपूर येथे २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत स्वानंदच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीच्या संघाने चमकदार कामगिरी केली. रत्नागिरीच्या संघाने केवळ खेळाच्या जोरावरच नाही, तर मैदानातील आपल्या आदर्श वर्तनानेही सर्वांची मने जिंकली. संपूर्ण स्पर्धेत दाखवलेल्या उत्कृष्ट खेळाडूवृत्तीसाठी रत्नागिरीच्या टीमला अत्यंत प्रतिष्ठेचा ‘बेस्ट डिसिप्लिन अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले. स्वानंद याने फलंदाजीत चमक दाखवत रत्नागिरी जिल्ह्याचे यशस्वी नेतृत्व केले. त्याच्या या अभूतपूर्व यशाने कौतुक करत आहे.

स्वानंदच्या यशात त्याचे आई-वडील आणि कोच सौ. योगिता खाडे आयरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. देवस्थळी परिवाराने कोच सौ. योगिता खाडे आयरे आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी यांचे आभार मानले आहेत. स्वानंदच्या या अष्टपैलू कामगिरीबद्दल आणि गुहागर तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर उंचावल्याबद्दल जानवळे पंचक्रोशी व क्रीडाप्रेमींकडून कौतुक होत आहे.