पुणे : पुण्यातील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेजवळील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्याच्या घटनेवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनी महाविद्यालयाला भेट दिल्यानंतर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेजवळ लावलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यास सांगितले. या घटनेनंतर भाजपने अमित ठाकरेंवर जोरदार टीका केली.
दरम्यान, या वादात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी भाजपवर निशाणा साधत, “भाजपाने साप समजून भुई धोपटणं बंद करावं. अमित ठाकरे यांनी मोदींचा फोटोच नको असं म्हटलं नाही. त्यांची भूमिका एवढीच होती की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावू नये,” अशी प्रतिक्रिया दिली.
अमित ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन करत अंधारे यांनी भाजपकडून या मुद्द्याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला. त्यामुळे या प्रकरणावरून मनसे, भाजप आणि ठाकरे गट यांच्यातील राजकीय आरोप-प्रत्यारोप आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
या संपूर्ण प्रकरणावर आता भाजपकडून आणखी काय प्रतिक्रिया येते आणि हा वाद पुढे कोणते वळण घेतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.