सावर्डे : विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल, शिरळ-चिपळूण यांच्या आयोजनाने ‘विद्याभारती पश्चिम क्षेत्रीय खेळकूद स्पर्धा २०२६’ गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट क्रीडा संकुल, डेरवण, चिपळूण येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होणार आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, शारीरिक सुदृढता, संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण व खिलाडूवृत्ती विकसित करण्याच्या उद्देशाने या पश्चिम क्षेत्रीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत खो-खो, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, योगासन आणि ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारांचा समावेश असून महाराष्ट्र व गुजरात या राज्यांमधून विविध शाळांतील स्पर्धक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून SGFI खेळांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र व गुजरातमधून अंदाजे २०० विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षक, पंच, व्यवस्थापक व क्रीडा कार्यकर्ते डेरवण येथे एकत्र येणार आहेत. त्यामुळे डेरवणच्या क्रीडा संकुलात दोन दिवस क्रीडा कौशल्य, शिस्त आणि उत्साहाचा आगळावेगळा संगम अनुभवायला मिळणार आहे.

स्पर्धेच्या उद्घाटन सत्राला चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री. शेखर निकम सर यासोबत वाशिष्ठ डेअरी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि.चे अध्यक्ष श्री. प्रशांतजी यादव, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्नाताई यादव तसेच उद्योजक श्री. सहदेव बेटकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघचालक श्री. बाबा चांदेकर, विद्याभारती पश्चिम क्षेत्राचे पदाधिकारी श्री. प्रशांत आठले आणि विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल- गुरुकुल प्रकल्पाचे अध्यक्ष एअर मार्शल निवृत्त हेमंत भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

विद्याभारतीच्या शैक्षणिक कार्यामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला विशेष महत्त्व दिले जाते. शिक्षणाबरोबरच शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक विकास साधण्यासाठी क्रीडा हा महत्त्वाचा घटक मानला जातो. त्याच भूमिकेतून या पश्चिम क्षेत्रीय खेळकूद स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करण्याबरोबरच विविध राज्यांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची, नवीन अनुभव मिळविण्याची आणि ‘खेळातून संस्कार व संस्कारातून व्यक्तिमत्त्व विकास’ या विचाराचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. डेरवणच्या निसर्गरम्य वातावरणात होणाऱ्या या स्पर्धेमुळे चिपळूणच्या क्रीडा क्षेत्रालाही नवी ऊर्जा मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या उत्साहाने संपूर्ण क्रीडा संकुल गजबजून जाणार आहे.

विद्याभारती भारतीय शिक्षा संकुल गुरुकुल शिरळच्या वतीने सर्व क्रीडाप्रेमी, पालक, शिक्षणप्रेमी नागरिक आणि माध्यम प्रतिनिधींनी या क्रीडा महोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.