गुहागर : तालुक्यातील पांगारी भूरकुंडा सडेवाडी येथील रस्ता विद्यमान सरपंचाने जेसीबीने खोदला. याबाबत जिल्हा परिषदेकडून कारवाईचे आदेश असताना अद्याप कारवाई का झाली नाही त्यांना पाठीशी घालताय काय त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा. अशा सूचना पंचायत समितीच्या मासिक सभेत सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांनी दिले.
गुहागर पंचायत समितीची मासिक सभा सभापती प्रणव पोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. तालुक्यातील गेली वर्षभर गाजत असलेल्या पांगारी भुरकुंडा सडेवाडी रस्त्याबाबतचा विषय चांगलाच गाजला. या रस्त्याबाबत सदस्य मंगेश जोशी यांनी बोलताना या रस्त्यासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर होता. रस्ता खोदल्याने पुढील दोन वाड्यांचा संपर्क तुटला आहे. याबाबत अभियंता मंदार छत्रे यांनी सांगितले की, जिल्हा परिषदे कडून याबाबत कारवाईचे आदेश आम्हाला प्राप्त झाले आहेत. यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे लवकरच यावर प्रत्यक्ष कारवाई केली जाईल. झोंबडी ग्रामपंचायत विषयी अनेक तक्रारी येत आहेत अशावेळी कोणतेही ठोस कारवाई होताना दिसत नाही प्रशासन त्यांना पाठीशी घालते काय, असा सवाल करण्यात आला. पालपेणे बौद्धवाडी स्मशानभूमी येथील रस्ता प्रश्न चौदा वर्षे प्रलंबित आहे. याबाबत जमीन मालकांमध्ये असणारे मतभेद मिटवण्यासाठी प्रत्यक्ष चर्चा करण्याचे ठरले पशुसंवर्धन विभाग अंतर्गत तालुक्यात शृंगार तळी बाजारपेठ, रानवी व इतर भागात सोडलेली मोकाट गुरे प्रश्नी पशुधन पर्यवेक्षक शिवशंकर चकाते यांना चांगलेच धारेवर धरले. मोकाट गुरांमुळे वारंवार होणारे अपघात लक्षात घेता आपल्या खात्याकडून याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून मार्ग काढा अशा सूचना केल्या. आठवडा बाजारात पॉपकॉर्न स्टॉलवर वापरण्यात येणारा मका हा शासकीय योजनेमधील वापरला असल्याचे आपल्या प्रत्यक्ष निदर्शनास आले. ही बाब गंभीर असल्याचे सभापती प्रणव पोळेकर यांनी सांगितले. उमेद अभियाना अंतर्गत बचत गटात बाबत जिल्हा व्यवस्थापक सचिन पाटणकर यांनी माहिती दिली. तसेच रानभाजा महोत्सव घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. पंचायत समिती इमारत व आवारामध्ये सीसीटीव्ही बसवण्याबाबत ठराव घेण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी प्रदीप शिंदे, पंचायत समिती सदस्य संदीप गोरिवले, गौरव वेल्हाळ, मंगेश जोशी, सुचिता घाणेकर, स्नेहा शिगवण, मानसी रांगळे, सारिका दाभोळकर, ऊर्वी खैर आदी उपस्थित होते.
गोपाळ कृष्ण गोखले यांचे जन्मगाव असलेल्या कोतळुक गावात भव्य स्मारक उभारण्याबाबत गुहागर पंचायत समितीच्या मासिक सभांमधून तसेच उपसभापती निलेश सुर्वे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या लेखी मागणीनंतर स्मारक उभारणीस मंजुरी मिळाली आहे. यामुळे लवकरच गुहागर तालुक्यात गोपाळ कृष्ण गोखले यांचे स्मारक उभे राहणार हे निश्चित झाले आहे याबाबतची माहिती उपसभापती निलेश सुर्वे यांनी दिली.