गुहागर : रत्नागिरी जिल्हा आरोग्य विभाग प्रशिक्षण केंद्र वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र चिखली येथील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, गटप्रवर्तक, आशा ताई यांच्यासाठी सीपीएचसी प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य वर्धिनी केंद्र या ठिकाणी देण्यात येणाऱ्या 13 सेवांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण नुकतेच पार पडले.
या प्रशिक्षणाचा चिखली आरोग्य मंदिर येथील 63 कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला. या प्रशिक्षणात गरोदर माता प्रसूती दरम्यान व पश्चात देण्यात येणाऱ्या सेवा, बालकांना देण्यात येणाऱ्या सेवा लसीकरण, कुटुंब कल्याण कार्यक्रम, सांसर्गिक असंसर्गिक आजरा, कान नाक घसा काळजी, क्षयरोग, कुष्ठ रोग, मलेरिया, पाणी शुद्धीकरण बाबत माहीती, मौखिक आरोग्य, मोफत औषधोपचार, प्रयोगशाळा तपासणी, बाह्यरुग्ण ओपीडी, रेफरल सेवा, आरोग्य विषयक मार्गदर्शन अशा 13 सेवांची माहिती देण्यात आली.
डॉ. शरण पाठोळे, डॉ . लिंगायत, श्रीम. शिरगांवकर, श्रीम. झोरे यांनी प्रशिक्षण दिले. विशेष बाब म्हणजे हे प्रशिक्षण भारतीय बैठक म्हणजे जमिनीवर सतरंजी घालू त्यावर सर्व अधिकारी, कर्मचारी एकत्र खाली बसून देण्यात आले. या प्रशिक्षणाला जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांनी भेट दिली.
या प्रशिक्षणवेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पांडे,
प्रा. आ. केंद्र चिखलीचे डॉ. इंगळे, विस्तार अधिकारी श्री. इरकर,
आरोग्य सहाय्यक श्री. जाधव, चिखली प्रा. आ. केंद्राचे आरोग्य सहाय्यक श्री. सागर मोरे, श्री भालेराव आदी उपस्थित होते.