पोलादपूर- तालुक्यातील लहूळसे गाव सोशल मीडियाद्वारे सर्वदूर पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध झाले असताना शहरांकडे नोकरी केल्यानंतर आर्थिक स्थैर्य मिळवून पुन्हा गावाच्या स्वच्छ वातावरणात निसर्गाच्या सान्निध्यात येऊन व्यवसाय उद्योग करण्याचा प्रयत्न यशस्वी केल्यास अधिक समाधानाचे आयुष्य जगता येईल. पैसा हे यशस्वीतेचे मोजमाप नाही तर समाजासाठी व आप्तांसाठी केलेल्या आदर्शवत प्रयत्नांना यश म्हणू शकतो. यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीचा प्रयत्न आवश्यक आहे, असे मत जिल्हा पोलीस अधीक्षक भापोसे आँचल दलाल यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दायित्व रायगड विभाग प्रचार प्रमुख तसेच राज्याचे वित्त विभागाचे उपसंचालक आनंद बिंदूमाधव जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या युवा संमेलनात जिल्हा पोलीस अधीक्षक भापोसे आँचल दलाल प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर पोलादपूर संघचालक प्रमोद दिक्षित हेदेखील उपस्थित होते
यावेळी युवकांनी पखवाज वादन सादर केले. प्रास्ताविक अभिषेक गरुड यांनी केले.
पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक व रयतचे पोलादपूर कनिष्ठ महाविद्यालय आणि आरटीआयचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. प्रारंभी युवा उद्योजकांच्या मनोगताची उद्घोषणा सुत्रसंचलनकर्त्याने केल्यानंतर आयोजकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांचे विचार ऐकण्यासाठी प्राधान्य दिले. मात्र, आँचल दलाल यांनी स्वतः युवा उद्योजकांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असल्याचे आवर्जून सांगितले. त्यामुळे लहुळसे येथील युवा उद्योजक विजय रिंगे आणि संकेत मोरे यांना त्यांचे विचार मांडण्याची संधी प्राप्त झाली.
यावेळी विजय रिंगे यांनी नोकरी सोडून गावी आल्यानंतर जो व्यवसाय केला त्यानुसार भाजीवाला, मासेवाला व कोंबडीवाला अशी हाक मारली गेली. जलमित्र संजय यादवराव आणि किशोर धारिया तसेच पर्यटन उद्योजक रामदास कळंबे यांच्या मदतीने सोशल मिडियाद्वारे प्रसिद्ध झालेल्या लहुळसे गावाला देशातील विविध भागातील पर्यटक भेटी देऊ लागले आहेत. दहा व्यक्तींना रोजगार निर्माण होऊन पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत, अशी माहिती दिली.
यावेळी संकेत मोरे यांनी सुरत येथे हाऊसकिपिंगच्या व्यवसायाद्वारे अनेकांना रोजीरोटी दिली. मात्र, वडील सुनील मोरे यांनी रोजगार निर्मिती गावाकडे येऊन करण्यासाठी आग्रह केला आणि मुंबई गोवा महामार्गावर हॉटेल राजमुद्रा पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे, अशी माहिती दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दायित्व रायगड विभाग प्रचार प्रमुख तसेच राज्याचे वित्त विभागाचे उपसंचालक आनंद बिंदू माधव जोशी यांनी जगात, देशात, राज्यात सर्व युवा वर्गाला राजकीय पक्ष व संघटना आकर्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे प्रतिपादन केले. भारतीय समाजाकडे समाज जोडण्याचे विचार असताना समाज तोडण्यासाठी जेन झी सारखी आंदोलने केली जातात. जगाचे कल्याण झाले तर ‘जेन झी’ थोडीच उपेक्षित राहणार आहेत काय, असा सवाल यावेळी आनंद बिंदूमाधव जोशी यांनी केला. यावेळी आनंद बिंदूमाधव जोशी यांनी युवा वर्गाला उद्देशून प्रगत समाजाचे अंधानुकरण करुन जीवनपद्धती अंगिकारण्यापेक्षा आपआपल्या चालीरितींनुसार आचरण करावे, असे आवाहन केले.
शेवटी माजी नगराध्यक्ष अश्विनी गांधी यांनी वंदे मातरम् गायन करून युवा संमेलनाची सांगता करण्यात आली.