चिपळूण : संबंधित प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. मात्र, या मागणीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्यावरच एफआयआर दाखल करण्यात आल्याचा आरोप करत चिपळूणमधील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या या कारवाईचा तीव्र निषेध केला.

राहुल गांधी यांनी सामाजिक न्याय आणि संविधानाच्या रक्षणाच्या दृष्टीने संबंधित प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. या कारवाईच्या निषेधार्थ चिपळूणमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला.

“लोकशाहीमध्ये अन्यायाविरोधात आवाज उठवणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. राहुल गांधी यांनी सामाजिक न्यायासाठी भूमिका मांडली म्हणून त्यांच्यावरच एफआयआर दाखल करणे म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे,” असा आरोप यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला.

यावेळी राहुल गांधी यांच्यावरील एफआयआर तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच संविधान, सामाजिक न्याय आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या निषेध आंदोलनात काँग्रेस नगरसेवक साजिद सरगुरोह, नगरसेविका सफागोठे, नगरसेविका निजबा नाखुदा, काँग्रेस तालुका महिला अध्यक्षा निर्मला ताई जाधव, अजित शिंदे, काँग्रेस सेवादल अध्यक्ष टी. डी. पवार, काँग्रेस सेवादल सचिव संदीप बांद्रे, ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते दादा आखाडे, प्राजक्ता सरफरे. रेश्मा टाके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.