दापोली :- पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाही दापोली शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या गंभीर समस्येविरोधात संतप्त झालेल्या ‘सुजाण दापोलीकर’ आणि नागरिकांच्या वतीने आज दापोली नगरपंचायतीवर एक जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. “पाणी आमचा हक्क आहे, तो मिळालाच पाहिजे!” अशी आक्रमक भूमिका घेत नागरिक या मोर्च्यात सहभागी झाले होते.​
सध्या सणासुदीचे दिवस जवळ आले आहेत, अशा पवित्र काळातही दापोली शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. “पावसाळ्यातही दापोलीकर तहानलेले!” आणि “पाणी नाही तर जगणे नाही!” अशा घोषणा देत नागरिकांनी नगरपंचायतीच्या कारभाराबद्दल तीव्र रोष व्यक्त केला.
पाणी सुरळीत न झाल्यास पाणीपट्टी भरणार नसल्याचे नागरिकांनी ठणकावून सांगितले.
प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे लोकांचा संताप वाढलेला दिसून आला.