चिपळूण : चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील अर्धांगवायू (पॅरालिस) रुग्णांना स्थानिक पातळीवर दर्जेदार उपचार मिळावेत, यासाठी चिपळूण येथील कै. बाळासाहेब माटे उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे स्वतंत्र पॅरालिस उपचार व पुनर्वसन केंद्र तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी टेरवचे सरपंच किशोर कदम यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मतदारसंघात अर्धांगवायूच्या रुग्णांची संख्या वाढत असून अनेक कुटुंबांना उपचारासाठी पुणे, कोल्हापूर, कराड तसेच कर्नाटकातील रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. त्यामुळे प्रवास, निवास आणि उपचाराचा मोठा आर्थिक बोजा सामान्य नागरिकांवर पडत आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेक रुग्णांच्या प्रकृतीवरही गंभीर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
कामथे येथील कै. बाळासाहेब माटे उपजिल्हा रुग्णालयात शासनाच्या माध्यमातून पॅरालिस उपचार व पुनर्वसन केंद्र सुरू झाल्यास चिपळूण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या केंद्रात तज्ज्ञ न्यूरोलॉजिस्ट, अत्याधुनिक फिजिओथेरपी विभाग, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, पुनर्वसन सुविधा तसेच गरजू रुग्णांसाठी मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याबाबत राज्य शासन व आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करून कै. बाळासाहेब माटे उपजिल्हा रुग्णालयात पॅरालिस उपचार व पुनर्वसन केंद्र मंजूर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती सरपंच किशोर कदम यांनी आमदार शेखर निकम यांना केली आहे.