मंडणगड : भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी संघटन अधिक मजबूत करण्यासाठी गावपातळीवर सक्रियपणे कार्य करावे, केंद्र व राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवावी आणि अधिकाधिक महिलांना पक्षाच्या संघटनेशी जोडावे, असे आवाहन भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला कार्यकारिणी सदस्या मंजुषा कुद्रिमोती यांनी केले.
3 सप्टेंबर 2026 रोजी पार्टीच्या कार्यालयात आयोजीत सभेत महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संघटन वाढीसंदर्भात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी महिला शक्तीच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक प्रभावी करण्याबाबत चर्चा करताना केंद्रशासनाचे पन्नास टक्के महिला आरक्षणाचे धोरण व विकसीत भारत ही संकल्पना महिलांनी प्रत्येक गावात संपर्क वाढवून स्थानिक महिलांपर्यंत पोहचवा त्याच्या समस्या जाणून घ्या व शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच पक्षाच्या ध्येयधोरणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असेही त्यांनी सांगितले. आगामी काळातील पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये महिला पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे, बूथस्तरावर संघटन मजबूत करणे आणि नव्या महिला कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडणे, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सतिष मोरे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा स्मिता जावकर, कोकण पदवीधर मतदार संघाचे कोकण सहसंयोजक अजय दळवी यांनीही महिला कार्यकर्त्यांना संघटन वाढीसंदर्भात मार्गदर्शन केले. सभेस ओबीसी जिल्हा अध्यक्ष सचिन थोरे, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, सोशल मिडीया जिल्हा संयोजक वैभव नारकर तालुका अध्यक्ष दत्ता महाडीक, महिला आघाडी अध्यक्षा श्रेया दळवी, शहर अध्यक्ष आनंद नारकर, सरचिटणीस अँड, सुशिल दळवी, उपाध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण, विजय दुर्गवले यांच्यासह महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
