मुंबई : महाराष्ट्रात महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, गृह खात्याच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरलेला नाही, असा आरोप वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केला आहे.
मागील वर्षभरात राज्यातील विद्यार्थिनींवर झालेल्या हल्ले, अत्याचार आणि हत्यांच्या घटनांबाबत पातोडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. गृहखाते हप्तेखोरीत व्यस्त असल्याचा आरोप करत, गुन्हेगारांवर वचक नसल्यामुळे महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
२०२५ मध्ये राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये ८.८५ टक्क्यांनी वाढ होऊन ८,६४३ प्रकरणे नोंदवली गेल्याचा दावा पातोडे यांनी केला. तसेच राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या २०२४ च्या अहवालानुसार, महिलांविरुद्धच्या ४७,९५४ गुन्ह्यांसह महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी नमूद केले. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
मागील वर्षभरात राज्यात विद्यार्थिनी आणि अल्पवयीन मुलींना लक्ष्य करणाऱ्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. मार्च २०२६ मध्ये जुन्नर, पुणे येथे लग्नास नकार दिल्याच्या रागातून महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. संगमनेर, अहिल्यानगर येथे सहावीतील विद्यार्थिनीवर शाळा सुटल्यानंतर सायकलवरून जात असताना ॲसिड हल्ला करण्यात आला. मार्च २०२६ मध्ये कोल्हापूर येथील नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापकाकडून १२ विद्यार्थिनींच्या विनयभंगाचे प्रकरण समोर आले. ऑगस्ट-सप्टेंबर २०२६ मध्ये आदिवासी आश्रमशाळेतील २१-२२ अल्पवयीन मुलींवर कर्मचाऱ्याकडून लैंगिक छळ झाल्याचा आरोप करण्यात आला. तसेच अमरावती येथे १७ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीची भरदिवसा रविनगर परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली.
याशिवाय नागपूर, कल्याण, कोल्हापूर, परभणी, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी एकतर्फी प्रेम, ब्लॅकमेलिंग, सामूहिक अत्याचार आणि पाठलागाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत शासनाच्या उपाययोजनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे पातोडे यांनी म्हटले.
महिला व विद्यार्थिनींची सुरक्षा ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र, घटनांमध्ये वाढ होत असतानाही शासन केवळ आकडेवारी सादर करून आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप त्यांनी केला. आश्रमशाळा, वसतिगृहे, महाविद्यालय परिसर तसेच रस्त्यांवरील सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना झाल्याचे दिसत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या –
अमरावतीतील विद्यार्थिनीच्या हत्येसह सर्व गंभीर प्रकरणांची जलद आणि पारदर्शक चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी.
विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही निरीक्षण अनिवार्य करावे.
आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून नियमित सुरक्षा तपासणी करावी.
लैंगिक अत्याचार व हल्ल्यांच्या प्रकरणांसाठी जलदगती न्यायालयांची व्यवस्था करावी.
पीडित मुली व त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक, कायदेशीर व मानसिक आधार द्यावा.
महिला व विद्यार्थिनींवरील अत्याचार आणि हत्यांना आळा घालण्यासाठी गृह विभागाने तातडीने ठोस आणि प्रभावी उपाययोजना कराव्यात.
महिला आणि विद्यार्थिनींवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, असा घणाघाती आरोप राजेंद्र पातोडे यांनी केला.