मुंबई – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा गौरवशाली वारसा लाभलेला आपला रिपब्लिकन पक्ष आहे. रिपब्लिकन पक्ष सर्व जाती धर्मियांचा पक्ष आहे. भारतीय संविधान ज्यांना मान्य आहे. संविधानाने दिलेली सर्वधर्मसमभावाची शिकवण ज्यांना मान्य आहे अशा सर्वांना रिपब्लिकन पक्षाचे सभासद होता येते. रिपब्लिकन पक्ष वाढवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने किमान 50 कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडले पाहिजे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.

ज्यांना भारतीय संविधान मान्य नाही त्यांना भारत देशात राहण्याचा अधिकार नाही असे ना. रामदास आठवले यावेळी म्हणाले.

सिल्वासा येथील फोर स्टोन रिसोर्ट येथे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करतांना ना. रामदास आठवले बोलत होते. फोर स्टोन रिसॉर्ट च्या हॉल मध्ये आयोजीत शिबिरात बोलताना ना. रामदास आठवले म्हणाले की या रिसॉर्ट चे नाव फोर स्टोन आहे.आम्ही चळवळीत अन्यायाविरुद्ध दगड मारत आलो आहे.आता मात्र दगड मारण्यापेक्षा सहकार चळवळीतून समृद्धी कडे जाण्याचा मार्ग कार्यकर्त्यांनी अवलंबावा.अन्यायाविरुद्ध लढा हा तीव्र केलाच पाहिजे त्यासोबत सहकार क्षेत्रातही कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उतरले पाहिजे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.