चिपळूण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेच्या ऐतिहासिक प्रसंगाची प्रेरणा घेऊन आयोजित करण्यात आलेल्या गरुडझेप – शिवचातुर्य मोहिमे त चिपळूण सायकलिंग क्लबच्या सायकल मावळ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या जिद्दीचे, समर्पणाचे आणि सायकलिंगमधील धैर्याचे दर्शन घडविले.आग्रा ते राजगड या ऐतिहासिक मार्गावर सायकल चालवत त्यांनी या मोहिमेच्या उद्देशाला आपल्या सहभागातून बळ दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी १७ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथील कैदेतून आपल्या अद्वितीय बुद्धीचातुर्याने सुटका करून घेतली. त्यानंतर त्यांनी राजगड गाठण्यासाठी केलेल्या प्रवासाचा निश्चित मार्ग इतिहासात स्पष्टपणे नोंदलेला नाही. याच ऐतिहासिक घटनेची प्रेरणा घेत आग्रा–ग्वालियर–शिवपुरी–गुना–पाचोर–देवास–ठिकरी–नरदाणा–चांदवड–संगमनेर–भोसरी–राजगड असा मार्ग निश्चित करण्यात आला असून त्याला ‘हिंदवी स्वराज्य पथ’ असे नाव देण्यात आले आहे.

‘गरुडझेप’ ही छत्रपती शिवाजी महाराजांचे धैर्य, चातुर्य, चिकाटी, संकटांवर मात करण्याची क्षमता आणि स्वराज्यनिष्ठा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम आहे. शिवज्योतीला केंद्रस्थानी ठेवून विविध गावांमधून प्रवास करताना स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधत शिवरायांचे विचार पोहोचविण्याचे कार्य या मोहिमेतून केले जाते.

या खडतर मोहिमेत चिपळूण सायकलिंग क्लबच्या श्री. प्रशांत दाभोळकर आणि श्री. हेमंत भोसले डॉ. अश्विनी, सौ. ज्योती परांजपे,सौ. रमा करमरकर,यांनी सहभाग घेतला. सलग ११ दिवसांचा हा प्रवास ऊन, पाऊस, सुसाट वारे, प्रचंड वाहतूक आणि विविध प्रतिकूल परिस्थितींमधून पार करावा लागला. मात्र मनात शिवरायांविषयीची श्रद्धा आणि मोहिमेच्या उद्देशाविषयीची निष्ठा असल्याने या सायकल मावळ्यांनी प्रत्येक अडचणीवर मात करत आपला प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला.

मोहिमेदरम्यान महाराष्ट्राबाहेरील विविध गावांमध्ये शिवरायांविषयी असलेला आदर आणि प्रेम यांना अनुभवायला मिळाले. अनेक ठिकाणी ग्रामस्थांनी शिवज्योतीचे उत्साहात स्वागत केले. विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. ग्रामस्थांनी केलेले आदरातिथ्य आणि तरुणांमध्ये दिसणारा उत्साह यामुळे या मोहिमेला एक वेगळे सामाजिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त झाले.

इतिहास केवळ पुस्तकांमध्ये न राहता तो प्रत्यक्ष अनुभवातून नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, शिवरायांचे विचार समाजापर्यंत नेणे आणि युवकांना प्रेरणा देणे, हे या मोहिमेचे खरे वैशिष्ट्य ठरले.

आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक करून सुरू झालेली शिवज्योत राजगडावर पोहोचली आणि शिवघोषात मोहिमेची सांगता झाली. सायकलिंगच्या माध्यमातून इतिहास, संस्कार, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालत चिपळूणच्या या सायकल मावळ्यांनी एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.

चिपळूण सायकलिंग क्लबच्या वतीने श्री. प्रशांत दाभोळकर ,श्री. हेमंत भोसले डॉ. अश्विनी, सौ.ज्योती परांजपे,सौ. रमा करमरकर,यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या जिद्दीला, समर्पणाला आणि ऐतिहासिक वारसा पुढे नेण्याच्या प्रयत्नांना मनापासून सलाम करण्यात येत आहे.

सायकलिंग केवळ शारीरिक क्षमतेची कसोटी नसून इतिहास, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रभावी माध्यम ठरू शकते, हे या सायकल मावळ्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. त्यांच्याǰ या उल्लेखनीय सहभागाचा आणि कामगिरीचा संपूर्ण चिपळूण वासियाना व चिपळूण सायकलिंग क्लबला मनस्वी अभिमान आहे.